साखर उत्पादनात १२ ते १४ टक्क्यांची वाढ शक्य: ब्रिकवर्क

नवी दिल्ली : गळीत हंगाम २०२०-२०२१ मध्ये देशभरात साखरेच्या उत्पादनात १२ ते १४ टक्के वाढ होईल. एकूण ३१.५ मिलियन टनापर्यंत साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज ब्रिकवर्क रेटिंग एजन्सीने वर्तवला आहे.

सध्या सुरू असलेल्या, २०२०-२१ या गळीत हंगामात देशभरात उसाचे क्षेत्र ५.२३ मिलियन हेक्टरपर्यंत आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र ७ टक्क्यांनी कमी म्हणजे ४.८७ मिलियन हेक्टर होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. तर गुजरातमधअये उसाच्या लागवड क्षेत्रात थोडी वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये साखर उत्पादनात किरकोळ घसरण होण्याची शक्यता आहे. येथील उसाच्या क्षेत्रात झालेली घट आणि राज्यात उसावर लाल सड रोगाचा झालेला फैलाव हे यामागील मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येते.

गूळ आणि खांडसरी उद्योगातील व्यवहार पूर्ववत झाल्याने गेल्या हंगामाच्या तुलनेत यावर्षी साखर उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर प्रदेशात आगामी काळात सुधारणा अपेक्षित आहे. शेतकरी येथे जास्त उत्पादन देणाऱ्या तसेच रोगांवरील प्रतिकारशक्ती असलेल्या वाणांची लागवड करीत आहेत. तमीळनाडूमध्ये २०२०-२१ मध्ये ऊस आणि साखर उत्पादनात किरकोळ घसरण होईल. इतर राज्यांमध्ये फारसे बदल झालेले नाहीत. त्यामुळे उसाचे आणि साखरेचे उत्पादन जैसे थे राहील असे ब्रिकवर्क रेटिंगच्यावतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here