लखनऊ: गेल्या साडेचार वर्षात उत्तर प्रदेशातून १२,००० कोटी रुपयांच्या इथेनॉलची खरेदी करण्यात आली आहे. देशात हे राज्य आता सर्वाधिक इथेनॉल उत्पादक म्हणून समोर येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. योगी आदित्यनाथ सरकारने केवळ दीर्घकाळातपासून थकीत असलेली ऊस बिले दिली नाहीत, तर साखर कारखानेही पुन्हा सुरू केले असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारने गेल्या साडेचार वर्षात केलेल्या सुधारणांवर प्रकाशझोत टाकला.
२०२२च्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या अभियानात पंतप्रधान मोदी यांनी ‘फरक स्पष्ट आहे’ ही कॅचलाइन सादर केली. बलरामपूर येथे सरयू योजनेचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी यांनी फरक स्पष्ट आहे हे दाखवून दिले. स्वातंत्र्यानंतर आमचे पहिले सरकार असे आहे की जे छोट्या शेतकऱ्यांविषयी विचार करते, असा दावा त्यांनी केला. दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सरकारी योजनांशी जोडले जात आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीतून शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. उत्तर प्रदेशात जैव इंधनासाठी कारखाने स्थापन केले जात आहेत, असे मोदी म्हणाले.