पंजाबमध्ये गव्हाचे गेल्यावर्षीपेक्षा १३.५ टक्के जादा उत्पादन

चंदीगढ : खराब हवामान, अवकाळी पाऊस असूनही पंजाबमध्ये या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १३.५ टक्के जादा गव्हाचे उत्पादन झाले आहे. याबाबत दैनिक ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पंजाबने यावर्षी जवळपास १६८ लाख मेट्रिक टन गव्हाचे उत्पादन नोंदवले आहे. तर गेल्या वर्षी एकूण उत्पादन १४८ लाख मेट्रिक टन झाले होते. यावर्षी खराब हवामानामुळे उभ्या पिकावर परिणाम झाला होता. त्यामुळे पंजाब सरकारने केलेल्या विनंतीनंतर केंद्र सरकारने गव्हाच्या खरेदीवेळी गुणवत्तेच्या निकषात सवलत दिली आहे.

पंजाब कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दावा केली की, खराब हवामानामुळे गव्हाच्या उत्पादनावर नकारात्मक प्रभाव पडला आहे. अन्यथा राज्यात गव्हाच्या उत्पादनाचा नवा उच्चांक नोंदवला गेला असता. पंजाब कृषी विभागाचे संचालक डॉ. गुरविंदर सिंह यांनी सांगितले की, जर खराब हवामानाने अडथळा आणला नसता तर आमच्या गव्हाचे उच्च उत्पादन १८२ लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचले असते.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आधीच १२१ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी केली आहे. गेल्या वर्षी खरेदी करण्यात आलेल्या ९६.४८ लाख मेट्रिक टनापेक्षा ती अधिक आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, पंजाबमध्ये प्रती एकर गव्हाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या ४२ क्विंटल प्रती एकरवरून वाढून ४७.२५ क्विंटल प्रती एकर झाले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या संगरुर जिल्ह्यात सर्वाधिक प्रती एकर ५३-५५ क्विंटल उत्पादन मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here