शंकर कारखान्यातर्फे एफआरपीपेक्षा १३५ रुपये जादा दर : रणजितसिंह मोहिते-पाटील

सोलापूर : शंकर सहकारी साखर कारखान्याची परिसराला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याच्या दृष्टीने जडणघडण सुरू आहे, असे साखर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. शंकर सहकारी सदाशिवनगर (ता. माळशिरस) च्या ५६ व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. शेतकरी हित सर्वोच्च असून साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सहकारीच राहिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. साखर कारखान्यातर्फे गतवर्षीच्या उसाला एफआरपीपेक्षा १३५ रुपये जादा दर देत असल्याचे मोहिते-पाटील यांनी सांगितले.

यावेळी साखर कारखान्याच्या साखर प्रकल्पाच्या प्रस्तावित विस्तारीकरण कामाच्या भांडवली खर्चास मंजुरी व इतर विषयांना खेळीमेळीत मंजुरी देण्यात आली. शंकर कारखान्याकडे ६ हजार १६० हेक्टर उसाची नोंद आहे. यंदाच्या गळीत हंगामात ऊस तोडणीसाठी २२५ मोठी वाहने, १७० टॅक्टर गाडी, १२० बैलगाडीची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात साखर कारखान्याच्यावतीने ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. जनरल मॅनेजर रविराज जगताप यांनी विषय वाचन केले. संचालक दत्तात्रय रणवरे यांनी आभार मानले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, शिवामृत चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे, शंकरराव माने-देशमुख, दत्तात्रय भिलारे, तुकाराम काळे अर्जुनसिंह मोहिते-पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरुप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here