देशात यंदा उच्चांकी १६५ लाख टन खाद्यतेल आयात

नवी दिल्ली : देशात नुकत्याच संपलेल्या तेल विपणन वर्षात १६५ लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे भाव कमी होते. त्यामुळे आयातीवरील खर्चही कमी झाल्याचे सॉल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे. मागील हंगामात याच काळातील आयात १४० लाख टनांच्या दरम्यान होती. म्हणजेच नुकत्याच संपलेल्या हंगामात २५ लाख टनांनी आयात जास्त झाली.

मागील वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या भावात सतत घसरण होत गेली. कमी झालेले भाव आणि खाद्यतेलाची उपलब्धता यामुळे भारतात खाद्यतेलाची आवक वाढली. तेल विपणन वर्ष नोव्हेंबर ते ऑक्टोबर असे असते. नुकत्याच संपलेल्या २०२२-२३ म्हणजेच नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या काळात देशात विक्रमी १६५ लाख टनांची आयात झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारलेले भाव आणि उपलब्धतेतील काही अडचण यामुळे ऑक्टोबर महिन्यात खाद्यतेल आय़ात कमी झाली. ऑक्टोबर महिन्यात देशात जवळपास १० लाख टनांची आयात झाली होती. दरम्यान, २०२२-२३ मध्ये आयातीवर १ लाख ३८ हजार कोटींचा खर्च झाला. तर मागीलवर्षी म्हणजेच २०२१-२२ या वर्षात आयातीवरील खर्च १ लाख ५६ हजार कोटी झाला होता. म्हणजेच खाद्यतेल आयातीवरील खर्च जवळपास १८ हजार कोटींनी कमी झाला. याचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या भावात झालेली घसरण असे दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here