नवी दिल्ली : देशात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व मंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यातून प्रदूषणात कपात होण्यासह परकीय चलनातही बचत झाली आहे.
याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, जर भारताने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट पार केले, तर यातून जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल.
ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणाचा आता सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. या धोरणामुळे एकीकडे साखर उद्योग आणि त्याच्याशी संलग्न कोट्यवधी लोकांच्या जीवनात बदल घडत आहे. दुसरीकडे यातून देशाला कोट्यवधी रुपयांच्या परकीय चलनाच्या बचतीतही मदत मिळाली आहे. जून २०२१ मध्ये सरकारने नोव्हेंबर २०२२ पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट पाच महिने आधीच पूर्ण करण्यात आले आहे. मंत्री शहा यांनी सुरतमध्ये कृभकोच्या बाया इथेनॉल प्रकल्पाच्या कोनशीला समारंभानंतर लोकांशी संवाद साधला.
मंत्री शहा म्हणाले की, इथेनॉलच्या उत्पादनातून आगामी काही दिवसांत पेट्रोलियम क्षेत्राची अर्थव्यवस्था बदलून जाईल. ते म्हणाले की, कच्च्या तेलाच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी जैव इंधन हा एक चांगला पर्याय आहे. जगभरात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने यासाठी एक सुयोग्य आणि वैज्ञानिक इथेनॉल धोरण तयार केले आहे.