विदर्भातून 200 कोटीची साखर निर्यात होणार

नागपूर : संपूर्ण जगभरात साखरेचे उत्पादन मागणीपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे दर घटले आहेत. त्याचा शेतकर्‍यांना सध्या फटका बसत आहे. परंतु, ही स्थिती विदर्भात फार काळ राहणार नसून लवकरच साखर विक्रेत्यांना सुगीचे दिवस येणार असल्याचे सांगून, पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक आणि साखर कारखानदार अडचणीत असताना विदर्भातून तब्बल दोनशे कोटींची साखर निर्यात होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

नागपूर येथे अ‍ॅग्रोव्हिजन कार्यक्रमाच्या समारोप समारंभात ऊस उत्पादकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ऊस उत्पादक आनंद राऊत, माजी खासदार विजय मुळे, डॉ. सी. डी. मायी, रवी बोरटकर, डॉ. गिरीश गांधी, रमेश मानकर आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, विदर्भातील शेतकर्‍यांमध्ये गुणवत्ता, चिकाटी आहे. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्यास आपला शेतकरी कुठलाही चमत्कार घडवू शकतो, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. कधीकाळी असलेले 400 कोटींचे कर्ज आता फिटले आहे. कारखान्याची वार्षिक उलाढाल आता तेराशे कोटींवर पोहोचली आहे.

ज्यादिवशी आपल्याकडील एक लाख टन साखरेचे क्रशिंग होईल, त्यादिवशी आपल्याकडील प्रत्येक कारखाना पाच ते दहा कोटींनी नफ्यात असणार आहे. हे सर्व विदर्भातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांमुळे सिद्ध होऊ शकणार आहे. शंभर एकरी ऊस उत्पादन घेणार्‍यांची संख्या वाढत आहे. ते पुढे म्हणाले, शेतकर्‍यांना बाराही महिने प्रशिक्षण देण्यात यावे, यासाठी कायमस्वरूपी कृषी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी यूपीएल या कंपनीचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यूपीएलचे संस्थापक रज्जूभाई श्रॉफ यांनी त्यासाठी फिफ्टी-फिफ्टी बेसिसवर मदत देण्याचे जाहीर केले आहे. लवकरच संपूर्ण राज्यात इथेनॉलचे पंप उभारण्यात येणार आहेत. त्याचा फायदा शेतकर्‍यांना होईल, असा विश्‍वास गडकरींनी व्यक्त केला. तसेच पुढील अ‍ॅग्रोव्हिजन प्रदर्शन 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मानस उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक समय बनसोड यांनी केले. यावेळी यंदा वेगवेगळ्या गटांमध्ये अ‍ॅग्रोव्हिजन शेतकरी पुरस्काराचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये रूपाली पाटील (दुग्धविकास), ज्योती चव्हाण (जलसंवर्धन), सुहास पाटील (जलसंवर्धन), ज्योती गुमणे (कृषिपूरक व्यवसाय), रवींद्र मेटकर (कुक्कुटपालन) यांचा समावेश आहे. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कृषीविषयी ज्ञान वाढावे, या उद्देशाने कृषी मंथन निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये महेंद्र वैरागडे (प्रथम), जयरामबाबा दानव (द्वितीय), शिरसा मन्ना आणि अमोल सोळंके (दोन्ही तृतीय) यांनी पारितोषिके पटकावली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here