नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) नव्याने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील साखर कारखान्यांनी १ ऑक्टोबर २०२१ ते ३० एप्रिल २०२२ यांदरम्यान ३४२.३७ लाख टन साखर उत्पादित केली आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या ३००.२९ लाख टनापेक्षा जवळपास ४२ लाख टन अधिक आहे. ३० एप्रिल २०२१ पर्यंत देशातील १०६ साखर कारखान्यांच्या तुलनेत ३० एप्रिल २०२२ पर्यंत २१७ कारखाने ऊस गाळप करीत आहेत.
महाराष्ट्रात उच्चांकी १३२.०६ लाख टन साखर उत्पादन
महाराष्ट्रात ३० एप्रिल २०२२ पर्यंत साखर उत्पादन १३२.०६ लाख टन झाले आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत १०५.६३ लाख टन साखर उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत २६.४ लाख टन उत्पादन अधिक झाले आहे. सध्याच्या २०२१-२२ या हंगामात ७६ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. अद्याप १२३ कारखाने सुरू आहेत. तर गेल्या वर्षी याच कालावधीत फक्त २३ कारखाने सुरू होते. ऊसाचे उच्चांकी उत्पादन झाल्यामुळे साखर कारखान्यांना ऊस तोडणी, वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागला आहे. राज्य सरकारने कारखान्यांना ऊस संपेपर्यंत गाळप करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी मदतीची घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेशात साखर उत्पादनात घसरण
उत्तर प्रदेशच्या साखर कारखान्यांनी ३० एप्रिल २०२२ पर्यंत ९८.९८ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत झालेल्या १०५.६२ लाख टन उत्पादनापेक्षा ६.६४ लाख टनाने कमी आहे. यावर्षी १२० पैकी ७८ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. ४२ कारखाने अद्याप कामकाज करीत आहेत. तर गेल्या वर्षी ३० एप्रिल २०२१ पर्यंत ४५ कारखाने सुरू होते. चालू हंगामाच्या पंधरवड्यात बहुतांश कारखाने बंद होतील. तर काही कारखाने मे २०२२ अखेरपर्यंत सुरू राहतील.
कर्नाटकमध्ये सध्या केवळ २ कारखाने सुरू
कर्नाटकमध्ये ७२ पैकी ७० कारखान्यांनी आधीच गाळप बंद केले आहे. सध्या केवळ २ कारखाने सुरू आहेत. ५९.०२ लाख टन साखर उत्पादित केली आहे. काही बंद कारखाने जून, जुलै २०२२ मध्ये सुरू होणाऱ्या खास हंगामात गाळप करू शकतील. गेल्या वर्षी याच कालावधीत ६६ कारखान्यांनी आपले कामकाज बंद केले होते. ४२.४८ लाख टन साखर उत्पादीत करण्यात आली होती. गेल्या वर्षी खास हंगामात २.२० लाख टन साखर उत्पादन झाले होते.
गुजरात, तमिळनाडूत साखर उत्पादनात थोडी वाढ
गुजरातमध्ये ३० एप्रिल २०२२ पर्यंत ११ साखर कारखान्यांसोबत ११.५५ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्या वर्षी या कालवाधीत ५ कारखान्यांनी १०.१५ लाख टन साखर उत्पादन केले होते. तामीळनाडूत या हंगामात २९ कारखान्यांपैकी ५ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. तर यावर्षी काही कारखाने विशेष सिझनमध्ये काम करु शकतील. ३० एप्रिल २०२२ पर्यंत राज्यात ८.४० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर गेल्या वर्षी याच तारखेला २७ कारखान्यांनी ६.०४ लाख टन साखर उत्पादन केले होते. २७ कारखान्यांपैकी ९ कारखान्यांचे कामकाज पूर्ण झाले आहे. तर गेल्या वर्षी ३० एप्रिल २०२१ पर्यंत १८ कारखाने सुरू होते. विशेष हंगामात तामीळनाडूत कारखान्यांनी २.१६ लाख टन साखर तयार केली होती.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि ओडिशा या उर्वरीत राज्यांनी ३० एप्रिल २०२२ पर्यंत ३२.३६ लाख टन साखर उत्पादित केली आहे. या राज्यांपैकी बिहार, पंजाब, छत्तीसगढ, राजस्थान आणि ओडिशा यामध्ये गाळप संपुष्टात आले आहे.
मार्च अखेरीपर्यंत १३६.१४ लाख टन साखर विक्रीचे अनुमान
साखर कारखान्यांच्या अहवालानुसार आणि इस्माच्या रिपोर्टनुसार मार्च २०२२ पर्यंत साखर विक्री १३६.१४ लाख टन होण्याचे अनुमान आहे. गेल्या वर्षी या कालावधीत १२९.४८ लाख टन उत्पादन झाले होते. हे यंदा ६.६६ लाख टनाने अधिक आहे. याशिवाय, सरकारने मे २०२२ पर्यंत देशांतर्गत साखर विक्री कोटा या कालावधीच्या तुलनेत ६.५ लाख टन अधिक आहे. इस्माच्या अपेक्षेनुसार चालू हंगामात देशांतर्गत साखरेचा खप गेल्यावर्षीच्या २६५.५ लाख टनाच्या तुलनेत २७२ लाख टन होईल.
जवळपास ८२-८३ लाख टन साखर निर्यातीचे करार
अहवालानुसार आतापर्यंत ८२-८३ लाख टन साखर निर्यातीचे करार करण्यात आले आहेत. यापैकी जवळपास ६८-७० लाख टन साखर भारतातून चालू वर्षात एप्रिल २०२२च्या अखेरपर्यंत भौतिक स्वरुपात निर्यात होण्याचे अनुमान आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत जवळपास ४३.१९ लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती. त्यानुसार चालू हंगामात भारतीय साखर उद्योगातून ९० लाख टनाहून अधिक साखर निर्यात केली जाईल अशी शक्यता आहे.
इथेनॉलसाठी ४१०.३२ कोटी लिटरचे करार
इथेनॉलच्या आघाडीवर ४२५.१७ कोटी लिटर एकूण एलओआयच्या तुलनेत ४१०.३२ कोटी लिटरचे करार करण्यात आले आहेत. आणि २४ एप्रिल २०२२ पर्यंत १६८.६६ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला आहे. आतापर्यंत एकूम पुवठ्यापैकी सुमारे १४९.१६ कोटी लिटर म्हणजे ८८ टक्क्यांहून अधिक इथेनॉल साखर उद्योगातून पुरवण्यात आला आहे. आतापर्यंत देशाने ९.८२ टक्के मिश्रणाचे उद्दीष्ट गाठले आहे.