मुंबई : महाराष्ट्रात आलेल्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेमुळे काही ठिकाणचा पारा ४६ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. यामध्ये किमान २५ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१६ नंतर ही सर्वाधिक संख्या आहे. उष्माघाताचे जवळपास ३७५ प्रकार उघडकीस आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाचे निरीक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील तापमान गेल्या शंभर वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. यासोबतच उष्णतेच्या लाटेत किमान २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना याचा फटका बसला आहे.
याबाबत न्यूज२४ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, उष्णतेच्या लाटेने झालेल्या मृत्यूपैकी १५ जणांचा मृत्यू विदर्भात झाला आहे. नागपूरमध्ये ११, अकोला येथे ३, अमरावती जिल्ह्यात एक अशी संख्याआहे. मराठवाड्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये जालन्यातील २, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबादमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या चौघांचा यात समावेश आहे. आवटे म्हणाले की, चंद्रपूर हे जागतिक हॉटस्पॉट आहे, जेथे तापमान ४६ डिग्री सेल्सिअसपर्यंत असले. आयएमडीने पुढील काही दिवसांत उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. थंड हवेची ठिकाणे असलेल्या महाबळेश्वरमध्ये तापमान ३१ तर पाचगणीत ३२ वर पोहोचले आहे.