नवी दिल्ली : सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये तांदळाची सरासरी किरकोळ किंमत २०२२ मध्ये ३७.०३ रुपये प्रती किलोपर्यंत वाढली आहे. २०१८ मध्ये ही किंमत ३०.०५ रुपये प्रती किलो होती. २०१८ ते २०२२ दरम्यान गव्हाचे दर २४.२ रुपये प्रती किलोवरून ३०.१५ रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचले आहेत. तर आट्याचा भाव २६.४३ रुपये प्रती किलोवरून ३४.५ रुपये प्रती किलो झाला आहे.
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी आकडेवारीनुसार २०१८ ते २०२२ या काळात गव्हाच्या आट्याच्या सरासरी किमतीत ३१ टक्के आणि मोहरीच्या तेलाच्या किमतीत ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी राज्यसभेत सुमारे दोन डझन जीवनावश्यक वस्तूंच्या सरासरी किरकोळ किमती दर्शविताना सरकारतर्फे ही माहिती देण्यात आली. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१८ पासून गव्हाच्या किमती २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर तांदळाच्या किमती गेल्या ५ वर्षात २३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. राज्यसभेत बोलताना अन्न आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले की, देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि आवश्यक अन्नपदार्थांच्या किमती स्थिर करण्यासाठी सरकार वेळोवेळी अनेक उपाययोजना करत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम किरकोळ किमतीच्या चलनवाढीवर झाला आहे. युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक बाजारात गव्हाची कमी उपलब्धता यामुळे गव्हाच्या मागणीत वाढ झाली असून, त्याचा परिणाम गहू आणि मैद्याच्या देशांतर्गत किमतीवरही झाला आहे.