‘अथणी-बांबवडे’ची ३२०० प्रमाणे बिले जमा : कार्यकारी संचालक योगेश पाटील

कोल्हापूर : अथणी शुगर्स बांबवडे शाहूवाडी युनिटने प्रतिटन ३२०० रुपयाप्रमाणे नोव्हेंबर अखेरपर्यंतची सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी दिली. गळीत हंगामाचा प्रारंभ नोव्हेंबर महिन्यात झाला. गतवर्षी कारखान्याचे विस्तारीकरण केले असून, गाळप क्षमता २५०० मे. टन प्रतिदिनवरून ५५०० मे. टन प्रतिदिन केली आहे. या वर्षी कारखाना चालू होण्यास थोडा विलंब झाला तरी ३० दिवसांत ८८९३० मे. टन गाळप पूर्ण करत सरासरी साखर उतारा १०.२० टक्केने ८१५२० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. चालू गळीत हंगामास पावसामुळे थोडा विलंब झाला आहे. तरी ऊस पुरवठाधारक शेतकरी, तोडणी, ऊस वाहतूकदार यांनी गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून उच्चांकी ६ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, युनिट हेड रवींद्र देशमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी कंत्राटदार, वाहतूकदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here