पुणे : यंदाही महाराष्ट्रात गेल्या हंगामाप्रमाणे जादा ऊस उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गाळपाची तयारी सुरू केली आहे.
यंदा गळीत हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार होता. मात्र, ही मुदत १५ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण २४६ साखर कारखाने आहेत.आणि त्यापैकी २०३ कारखाने यंदाच्या, २०२२-२३ च्या हंगामात गाळप सत्रात सुरू राहतील अशी शक्यता आहे. आतापर्यंत केवळ ३५ कारखान्यांनी १५ ऑक्टोबरपासून ऊसाचे गाळप सुरू करण्याची परवानगी घेतली आहे. हंगाम २०२१-२२ मध्ये १,४२० लाख टन ऊस गाळप करून १३७ लाख टन साखर उत्पादन करण्यात आले होते. या वर्षी महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन १ लाख टनाने वाढण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी मराठवाडा विभागातील काही कारखान्यांना जूनपर्यंत गाळप करावे लागले. त्यांना मदत करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून ऊस तोडणी हार्वेस्टर पाठविण्यात आले होते. शेतकऱ्यांचा ऊस तोडणीविना शिल्लक राहू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. राज्यात यावर्षी ऊस गाळप १,४१३ लाख टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.