बिजनौर : ऊस विभागाकडून गावागावात क्षेत्रनिहाय उसाचा सर्व्हे सुरु आहे. या क्षेत्रातील ३५५ गावांत ३९ हजार हेक्टरमधील सर्व्हे लवकर पूर्ण करण्यासाठी ऊस विभाग आणि साखर कारखान्यांनी ४८ टीम तैनात केल्या आहेत. २० एप्रिलपासून सुरू झालेल्या सर्व्हेमध्ये आतापर्यंत गेल्या आठ दिवसांत जवळपास ६५० हेक्टर क्षेत्रातील सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी आवाहन करुनही शेतकऱ्यांनी ऊस क्षेत्राबाबत ऑनलाईन स्वयं घोषणापत्र देण्याबाबत स्वारस्य दर्शविलेले नाही. ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक अमित कुमार पांडे यांनी सांगितले की, धामपूर विभागातील ३५५ गावांत ३९ हजर हेक्टर क्षेत्रात सर्व्हे करण्यात येत आहे.
याबाबत लाईव्ह हिंदूस्थान डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, यामध्ये शेतकऱ्यांच्या लागण आणि खोडवा उसाचा सर्व्हे केला जात आहे. यावेळी ऊस सर्वेक्षणादरम्यान प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी सिंचनाचा प्रकार, सहपूरक पिके घेण्याची पद्धती, ठिबक सिंचनावर केली जाणारी शेती अशा विविध निकषांची पडताळणी केली जात आहे. हा ऊस सर्व्हे जीपीएस सिस्टीमपासून केला जात आहे. शेतकऱ्यांनी या सर्व्हेवेळी आपल्या प्लॉटवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वेक्षण ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे.