सोलापूर विभागात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ५०२ कोटी रुपये थकीत

सोलापूर : सोलापूर विभागातील ३३ कारखान्यांकडे १५ फेब्रुवारीअखेर ५०२.३२ कोटी रुपये एफआरपी थकली आहे. विभागात सोलापूर व धाराशिव हे जिल्हे समाविष्ट आहेत. यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील ३५ तर धाराशिव जिल्ह्यातील १४ अशा एकूण ४९ कारखान्यांनी हंगाम घेतला आहे. यापैकी सोलापूर जिल्ह्यातील २५ कारखान्यांनी ४१२.४९ कोटी रुपये एफआरपी थकविली आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे

सोलापुरातील २५ कारखान्यांकडे ४१३ कोटी तर धाराशिवमधील ८ कारखान्यांकडे एफआरपीचे ९० कोटी रुपये थकीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ३५ कारखान्यांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत एफआरपीचे २,५४१ कोटी व धाराशिव जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ७०६ कोटी असे एकूण ३,२४७ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. थकीत एफआरपी बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले की, थकीत एफआरपीबाबत १४ फेब्रुवारीला साखर सहसंचालकांना निवेदन दिले आहे. ती मिळण्यासाठी २ मार्चपासून आंदोलन करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here