साखर कारखान्यांनी थकवले शेतकऱ्यांचे ७५६ कोटी रुपये

शामली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त होवून जवळपास अडीच महिने उलटले आहेत. मात्र, कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ७५६.६७ कोटी रुपये थकवल्याने शेतकऱ्यांना आजच्या महागाईच्या काळात घर चालविण्यास अडथळे येत आहेत. दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासह मुलांचे शिक्षण व औषधोपचार या गोष्टींसाठी व्याजाने पैसे घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील शामली साखर कारखान्याचा गळीत हंगाम १५ मे, थानाभवन कारखान्याचा गळीत हंगाम १५ एप्रिल आणि ऊन कारखान्याचा गळीत हंगाम १८ एप्रिल रोजी समाप्त झाला. हंगाम समाप्त झाल्यानंतर साखर कारखान्यांनी उसाचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत. ऊस विभागाकडील आकडेवारीनुसार, या साखर कारखान्यांकडे ७५६.६९ कोटी युपये थकीत आहेत. यामध्ये शामली कारखान्याकडे २८१.६२ कोटी रुपये, ऊन कारखान्याकडे १७०.७३ कोटी रुपये आणि थानाभवन कारखान्याकडे सर्वाधिक ३०३.३४ कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. भाकियूचे राष्ट्रीय सचिव कपिल खाटियान यांनी सांगितले की, शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. त्यामुळे मुलांची फी भरणे, घरातील ज्येष्ठांचा औषधोपचार व इतर दैनंदिन वस्तू खरेदीसाठी शेतकऱ्यांना व्याजाने पैसे घ्यावे लागत आहेत.

सपाचे वरिष्ठ नेते प्रा. सुधीर पवार यांनी सांगितले की, गळीत हंगाम संपल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचे जवळपास ६००० कोटी रुपये कारखान्यांनी थकवले आहेत. यात ७५६ कोटी रुपये आपल्या जिल्ह्यातील आहेत. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याने किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज भरण्यासाठीही इतरांकडून उसने पैसे घ्यावे लागले आहेत. किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष सवित मलिक यांनी सांगितले की, शामली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

बामनौलीतील शेतकरी सोहनवीर सिंह, दलबीर सिंह, मांगेराम, विनोद यांनी सांगितले की, व्याजाने पैसे घेऊन घर चालवावे लागत आहे. कारखान्याने पैसे दिले असते तर हा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागला नसता. आमच्या या बिकट स्थितीकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. सरकारच्या स्तरावरही शेतकऱ्यांच्या ऊस बिले देण्याच्या संथ गतीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सरकारने त्वरीत उपाययोजना करून नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना पैसे मिळतील याची काळजी घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here