नवी दिल्ली : भारतात कोरोना संक्रमण गतीने फैलावत असले तरी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊन लागू करणार नाही असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे. ही प्रक्रिया फक्त छोट्या कंटेन्मेंट झोनपुरती मर्यादीत ठेवली जाणार आहे.
जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हीड मालपास यांच्यासोबत एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत सीतारमण यांनी या जागतिक महामारीच्या काळात जागतिक बँकेने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. विकासासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी जागतिक बँकेने कर्ज मर्यादा वाढविली ही खूप चांगली बाब असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या.
अर्थ मंत्रालयाने ट्विट करून स्पष्ट केले की सीतारमण यांनी भारताने कोविडच्या काळात जे पाच उपाय केले, त्याची माहिती दिली. संक्रमण रोखण्यासाठी टेस्ट, ट्रॅकिंग, व्हॅक्सिन आणि कोविड १९च्या अनुकूल व्यवहार करण्याचा फॉर्म्यूला वापरला गेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही आम्ही मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊन करणार नाही असे त्यांनी सांगितले. आम्ही आमची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करू शकत नाही. रुग्णांना स्थानिक स्तरावर वेगवेगळे ठेवणे आणि त्यांना क्वारंटाइन करणे हे उपाय असतील.
कोरोनाची दुसरी लाट थोपविली जाईल. मात्र, यासाठी लॉकडाउनची गरज पडणार नाही. सरकारने एलईडी बल्ब वितरण, इथेनॉल मिश्रण कार्यक्रम या माध्यमातून बायो फ्यूएल पॉलिसी, वाहन स्क्रॅप पॉलिसीवरही काम सुरू ठेवले असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.


















