पुणे : दैनिक ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे कि, राज्यातील बाजारपेठांमध्ये वस्तू आणि सेवाकर अर्थातच जीएसटी कर बुडवून रिकव्हरी चोरलेल्या साखरेची आवक वाढत असल्याच्या चर्चेने सध्या जोर धरला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घोषित केलेल्या कोट्यापेक्षा राज्यात सर्वदूर अधिक साखर बाजारात छुप्या मागनि येत असल्याचे खात्रीलायकरीत्या सांगण्यात येते. त्यामुळेच मागणीच्या तुलनेत केंद्राकडून देण्यात आलेल्या कमी कोट्याच्या घोषणेनंतर दर वाढण्याऐवजी साखरेचे दर घटत असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे, असेही संबधित वृत्तात म्हटले आहे.
केंद्र सरकारने जानेवारी महिन्यासाठी २२ लाख टन साखर कोटा खुला केला आहे. संक्रांतीचा सण, यात्रा-जत्रांमुळे साखरेस मागणी चांगली राहण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. मात्र, राज्यातील सर्वदूर बाजारपेठांमध्ये कारखाने सुरू झाल्यापासून कोट्यापेक्षा बाजारात साखरेचा पुरवठा अधिक होत आहे. त्यामुळे साखरेचे दर कमी कोट्यानंतरही मंदीकडे झुकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घाऊक बाजारपेठेतील साखरेचा एस ३० ग्रेड साखरेचा किंवटलचा दर ३९५० ते ४००० रुपये असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रिकव्हरी चोरलेल्या साखरेचा बाजारात सुळसुळाट रोखण्याची जबाबदारी साखर आयुक्तांसह संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर असून, त्यांनी असे साखरेचे मालट्रक्स तपासून कारवाईची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना केली आहे.
दै. ‘पुढारी’शी बोलताना शेट्टी म्हणाले, कारखान्यांमधून रिकव्हरी चोरीतील साखर ही जीएसटी बुडवून येत आहे. त्याची लगेच विल्हेवाट लावण्यासाठी अशी साखर बाजारात विक्रीस येऊन साखरेचे दर पडण्यावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे साखर आयुक्तांसह सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या साखरेच्या ट्रक्सची तत्काळ तपासण्या सुरू कराव्यात, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. त्यामुळे रिकव्हरी चोरीतील साखर बाहेर येण्यास अटकाव बसेल. तसेच साखर कारखान्यांच्या गोदामांची अचानक तपासणीसुद्धा करण्याची गरज आहे. म्हणजे कारखान्याकडे हंगामाच्या सुरुवातीस असलेला आरंभीचा साखरेचा शिलकी साठा, प्रत्यक्षात यंदाच्या हंगामात झालेले निव्वळ साखर उत्पादन, झालेली साखरविक्री आणि गोदामात शिल्लक असलेल्या हजर साखरेचा साठा याची पडताळणी करणे शक्य होईल. या तपासणीतूनही सत्य समोर येईल. ही कारवाई युद्धपातळीवर केल्यास साखरेच्या दर क्विंटलला चार हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असा दावाही शेट्टी यांनी केला.

















