अहिल्यानगर : मुळा साखर कारखान्याने माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या गळीत हंगामात अव्वल कामगिरी केली आहे. तालुक्यात असलेले दोन साखर कारखाने व मराठवाड्यातील एक साखर कारखान्याने तालुक्यात ऊसतोडीची यंत्रणा उभी केलेली असताना ‘मुळा’कडे नोंद दिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा ऊस नोंदीप्रमाणे गाळप केला जात आहे. कारखान्याने गेल्या ८० दिवसांत ७ लाख २ हजार ८० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या कालावधीत कारखान्याच्यावतीने पाच लाख ४८ हजार ९५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याची वीज स्थितीही भक्कम आहे. तसेच कारखान्याने आतापर्यंत ५६, ३८,१२८ लीटर इथेनॉल उत्पादन घेतले आहे.
मुळा कारखान्याला मागील वर्षी अवघ्या ८५ दिवसांत गळीत हंगाम आटोपता घ्यावा लागला होता. मात्र यंदा चित्र बदलले आहे. कारखान्याने गेल्या २४ तासांत ९,६५० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. चालू साखर उतारा ११.२१ टक्के असून सरासरी साखर उतारा १०.२४ इतका आहे. कारखान्याने आतापर्यंत ७ लाख टन ऊस गाळपाचा टप्पा गाठला आहे. मात्र, अजून एक ते दीड लाख टनाचे गाळप करताना कारखाना फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू राहील. देणे असलेले सर्व शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट लवकरच बँक खात्यात जमा केले जाणार आहे अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी दिली. कारखान्याच्यावतीने ऊस गळीत प्रमाणेच वीज निर्मिती व इथेनॉल प्रकल्पाचे उत्पन्न समाधानकारक राहिले आहे.

















