कोल्हापूर : लोकनेते मंडलिक कारखान्याचा वजन काटा योग्य, भरारी पथकाने दिला निर्वाळा

कोल्हापूर : वैधमापनशास्त्र निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका साखर कारखान्याच्या वजन काट्याची अचानक पाहणी केली. पथकाने अचानक वजन काट्यावर येऊन वजन मापे कायद्यातील तरतुदीनुसार काटे तपासले. कागल विभागाचे वैधमापनशास्र निरीक्षक संतोष खाडे यांनी गाडी अड्ड्यावर वजनकाट्यावरून वजन करून गव्हाणी जवळ गेलेले ४ ट्रॅक्टर व १ बैलगाड़ी छकडी या वाहनांना परत बोलावले. केनयार्ड सुपरवायझरनी ही वाहने परत वजन काट्यावर बोलावून त्यांचे फेर वजन करून दाखवले. यावेळी त्यांची वजने बरोबर व अचूक असल्याचे दिसून आले. हा वजनकाटा अचूक व योग्य असल्याचे प्रमाणपत्र वैद्यमापन निरीक्षकांनी दिले.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूरचे उपसंचालक जी. जी. मावळे यांनी आकस्मिक भेट देऊन काटा तपासणी कामकाजाची माहिती घेतली. याबाबत कारखान्याच्या प्रशासनाने सांगितले की, वजन काटा अचूक असल्याचा निर्वाळा पथकाने दिला आहे. या पाहणीत २० किलोंची बिडाची ४०० वजने काट्यावर मांडणी करून त्यांचे वजन तपासले असता ते अचूक असल्याचे दिसून आले. यावेळी पुरवठा निरीक्षक अधिकारी एस. बी. तोडसाम, मुरगूड पोलीस ठाण्याचे हेड कॉन्टेबल राजाराम पाटील, सहकारी संस्था (साखर) चे लक्ष्मण आकुलवार, तोडणी वाहतूक कंत्राटदार वसंत पाटील, पांडुरंग ताटे, मुख्य शेती अधिकारी प्रताप मोरबाळे, केनयार्ड सुरवायझर अनिल राऊत, अॅग्री ओव्हरसियर प्रवीण पाटील, असिस्टंट इंजिनिअर कृष्णात पोवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here