लातूर : नळेगावचा जय जवान कारखाना सुरू करा; आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे शेतकऱ्यांचे साकडे

लातूर : नळेगाव (ता. चाकूर) येथे असलेला ‘जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना’ गेल्या दोन दशकापासून बंद अवस्थेत आहे. हा कारखाना किल्लारी कारखान्याच्या धर्तीवर सुरू करावा, अशी मागणी नळेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.११) आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे केली आहे. नळेगाव (ता. चाकूर) येथे असलेला हा जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना अहमदपूर, चाकूर, शिरूर अनंतपाळ आणि उदगीर या परिसराच्या मध्यभागी आहे. या कारखान्याचे दहा हजारांहून अधिक सभासद आहेत. हजारो शेतकरी व कामगारांचे जीवन या कारखान्यावर अवलंबून आहे. मात्र अनेक वर्षांपासून कारखाना बंद असल्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कारखाना परिसराच्या चारही बाजूंनी पाण्याचे स्रोत उपलब्ध असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. लाखो टन ऊस उपलब्ध असतानाही साखर कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस दूरवरच्या कारखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. शिवाय या कारखान्याला स्वतःची तीनशे एकर जमीन आहे. त्यामुळे हा कारखाना जर कोणी व्यवस्थित चालविला तर अन्य उद्योगही या जमिनीवर करता येतील असा विश्वास शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत शब्द दिला असल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले. त्या अनुषंगाने शासनस्तरावर तत्काळ पाठपुरावा करून कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे शेतकऱ्यांनी आमदार अभिमन्यू पवारांना साकडे घातले.

मुळ सतरा कोटी कर्ज असलेल्या कारखान्यावर आता व्याजासह ८२ कोटीचे कर्ज आहे. हे कर्ज महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर आमदार पवार यांनी कारखान्याची सर्व माहिती घेऊन त्याचे भागभांडवल, कागदपत्रांची पडताळणी व अर्चना पाटील चाकूरकर, बसवराज पाटील मुरूमकर यांच्याशी चर्चा करण्यात येईल. कारखाना सुरु करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्यात येईल, असे शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी चंद्रशेखर तांदळे, तुकाराम पारवे, सूर्यकांत चव्हाण, मदन गायकवाड, दयानंद काळे, शिवाजी पाटील, कमलाकर सूर्यवंशी, रामकिसन कातपुरे, तुकाराम नरवाडे, श्रीमंत शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here