छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४,२०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी महालगाव येथे संतप्त शेतकऱ्यांनी चार तास तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वैजापूर-गंगापूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. पंचगंगा कारखान्याने पहिली उचल ३,६०० रुपये देऊन उर्वरित ३०० रुपये नंतर द्यावेत, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला. आंदोलनामुळे प्रवासी व वाहनधारकांचे मोठे हाल झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कोल्हापूरप्रमाणे सर्व कारखान्यांनी ऊस दराचा फॉर्म्युला लागू करावा, अशी मागणी शेतकरी नेते गणेश तांबे व आंदोलकांनी लावून धरली. पंचगंगा साखर कारखान्याने प्रतिटन ३,९०० रुपये भाव जाहीर करावा, या मागणीसाठी सोमवारी सकाळी हे आंदोलन झाले. अखेर पंचगंगा कारखान्याच्या मुख्य शेती अधिकाऱ्यांनी केंद्र शासन व साखर आयुक्तांच्या ‘एफआरपी’ निर्णयानुसार महाराष्ट्रात जो दर ठरेल तो देण्याचे आणि स्थानिक ऊस उत्पादकांना तोडणीत प्राधान्य देण्याचे लेखी पत्र दिले. तहसीलदार सुनील सावंत यांच्या उपस्थितीत हे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी चारला आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात बाळासाहेब जानराव, शेतकरी संघटनेचे गणेश तांबे, सुभाष भराडे, चंद्रशेखर साळुंके, किशोर मगर, भावराव दुशिंग, भाऊसाहेब बनसोडे, प्रकाश ठुबे, बाबासाहेब काळे, रामनाथ नवसारे, प्रकाश दुशिंग, सचिन दुशिंग, अर्चना साळुंके आदी सहभागी होते.

















