बीड : जिल्ह्यात अवघ्या ५,००० कामगारांना ओळखपत्र वितरण, महामंडळाची गती संथ!

बीड : जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाला अवघ्या ५००० ऊस तोडणी मजुरांना ओळखपत्रे देण्यात यश आले आहे. अधिकृत माहितीनुसार, जिल्ह्यात ऊसतोडणी कामगाराच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून ३१ मार्चअखेर एकूण ५८४५ ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते १ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत प्रातिनिधिक स्वरूपात १० ऊसतोड कामगारांना ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यात पाच लाखाहून अधिक ऊसतोड मजूर असल्याचे सांगितले जाते. एवढ्या मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर असलेल्या या जिल्ह्यात आतापर्यंत इतकी कमी नोंदणी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सर्व मजुरांची नोंद होणार कधी आणि त्यांना विविध योजनांचा लाभ मिळणार कधी, हा प्रश्न कायम आहे. ऊस तोडणी मजुरांच्या नोंदणीसाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली असून या एजन्सीकडून नोंदणीचे काम सुरु आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या लाभाबाबतही असाच ‘गतीमान’ कारभार अनुभवायला मिळत असल्याने ऊसतोड मजुरांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने ऊस तोडणी कामगारांसाठी सप्टेंबर २०१९ मध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेल्या सात वर्षाच्या काळात बीड जिल्ह्यातील फार कमी ऊसतोड मजुरांना ओळखपत्र देण्यात सामाजिक न्याय विभागाला यश आले आहे. बीडसह शेजारच्या काही जिल्ह्यातून लाखो ऊसतोड मजुर दरवर्षी परजिल्ह्यात, परराज्यात ऊसतोडीसाठी जातात. त्यांना सुविधांसाठी आजही झगडावे लागते. महामंडळाची घोषणा, स्थापना आणि अंमलबजावणी यातील अंतर खूप मोठे आहे. जिल्ह्यातून ऊसतोडीला गेलेल्या काही मजुरांचा अपघाती मृत्यू, अपंगत्व, झोपडीला आग, बैलाचा मृत्यू अशा घटना घडलेल्या आहेत. त्याचे प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे सादर केले गेले, त्यातील काही प्रकरणांना मंजूरीदेखील मिळाली, परंतु मदत मात्र अद्याप पदरात पडलेली नाही. याबाबत सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले यांनी सर्व ऊस तोडणी मजुरांची नोंद करण्याची सूचना संबंधीत एजन्सीला दिल्याचे सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here