पटना: सम्राट चौधरी यांची मंगळवारी बिहारमधील भाजप विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली असून, नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या 21 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यांनी आज आपला राजीनामा सादर केला. राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन (निवृत्त) यांनी तो स्वीकारला. सम्राट चौधरी हे बिहारमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. भाजपचे सहयोगी उपेंद्र कुशवाहा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री असलेल्या सम्राट चौधरी यांचे “नवीन जबाबदारी”बद्दल अभिनंदन केले.
राजीनामा दिल्यानंतर केलेल्या दीर्घ पोस्टमध्ये नितीश कुमार यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या कामांची यादी देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले.एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “आपल्याला माहीत आहे की 24 नोव्हेंबर 2005 रोजी राज्यात प्रथमच एनडीए सरकार स्थापन झाले. त्यानंतर राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले आणि आम्ही सातत्याने विकासकामात गुंतलो आहोत. सुरुवातीपासूनच सरकारने समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी काम केले—हिंदू, मुस्लिम, सवर्ण, मागासवर्ग, अतिमागासवर्ग, दलित किंवा महादलित—सर्वांसाठी काम झाले. शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज किंवा शेती—प्रत्येक क्षेत्रात काम करण्यात आले. महिला आणि युवकांसाठीही मोठ्या प्रमाणावर काम झाले.” ते म्हणाले की, एनडीए सरकारने बिहारच्या जनतेसाठी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. “आम्ही सातत्याने बिहारच्या जनतेची सेवा केली. नव्या सरकारला माझे पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन राहील. पुढेही खूप चांगले काम होईल आणि बिहार मोठी प्रगती करेल. मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि शुभेच्छा देतो,” असे त्यांनी पुढे म्हटले. (एएनआय)

















