नवी दिल्ली : पुरवठा साखळीची सातत्यता राखण्यासाठी सरकारच्या व्यापक प्रयत्नांअंतर्गत सुमारे 94 टक्के घरगुती एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी प्रमाणीकरण कोडद्वारे करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या आंतर-मंत्रालयीय ब्रिफिंगमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवरही सरकारने एलपीजी, पीएनजी, पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत.
शर्मा यांनी सांगितले की, घरगुती एलपीजीचा पुरवठा सामान्य राहिला असून कोणत्याही वितरकाकडून तुटवड्याची माहिती मिळालेली नाही. सुमारे 94 टक्के सिलेंडर डिलिव्हरी प्रमाणीकरण कोडद्वारे केल्या जात आहेत. काल सुमारे 45 लाख बुकिंग झाली होती, त्यापैकी सुमारे 51 लाख घरगुती एलपीजी सिलेंडर वितरित करण्यात आले. भारत सरकारने पुरवठा सुमारे 70 टक्क्यांपर्यंत पुनर्संचयित केला आहे. परिणामी एप्रिल महिन्यात सुमारे 1,31,000 टन म्हणजेच सुमारे 69 लाख 19 किलोचे सिलेंडर विकले गेले आहेत. याशिवाय काल एका दिवसात 8,199 टन व्यावसायिक एलपीजीची विक्री झाल्याचे त्यांची सांगितले.
शर्मा म्हणाल्या की, 5 किलोच्या सिलेंडरबाबत 23 मार्चपासून आतापर्यंत 20 लाखांहून अधिक सिलेंडर विकले गेले आहेत. यापूर्वी उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (DPIIT) इंधन, वायू आणि आवश्यक कच्चा मालाचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विविध औद्योगिक क्षेत्रांसाठी नियामक उपाययोजना आणि आदेश लागू केले होते. या उपक्रमांमध्ये सीमाशुल्क सवलतींपासून ते पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना (PESO) अंतर्गत परवाना प्रक्रियेला गती देणे यांचा समावेश होता.

















