भुवनेश्वर : भारताने ओडिशामधील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम बेट येथून 8 मे 2026 रोजी एमआयआरव्ही (मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल) प्रणालीसह प्रगत अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या क्षेपणास्त्राची विविध पेलोडसह चाचणी घेण्यात आली. हिंद महासागर क्षेत्रातील विस्तृत भौगोलिक परिसरात वेगवेगळ्या लक्ष्यांवर अचूक प्रहार करण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना सांगितले की, एमआयआरव्ही प्रणालीसह प्रगत अग्नी क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरली. चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने अनेक पेलोड वेगवेगळ्या लक्ष्यांवर अचूकपणे पोहोचवले.
क्षेपणास्त्राच्या संपूर्ण उड्डाण मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी जमिनीवरील तसेच जहाजांवरील ट्रॅकिंग स्टेशनचा वापर करण्यात आला. प्रक्षेपणापासून ते सर्व पेलोड लक्ष्यावर आदळेपर्यंत संपूर्ण ट्रॅजेक्टरीचे निरीक्षण करण्यात आले. फ्लाइट डेटामधून सर्व मोहिमेची उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची पुष्टी झाली. या यशस्वी चाचणीमुळे भारताने पुन्हा एकदा एकाच क्षेपणास्त्र प्रणालीद्वारे अनेक रणनीतिक लक्ष्यांवर प्रहार करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. या क्षेपणास्त्राचा विकास डीआरडीओच्या प्रयोगशाळांनी देशातील विविध उद्योगांच्या सहकार्याने केला आहे. चाचणीवेळी डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि भारतीय लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ, भारतीय लष्कर आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, या यशामुळे देशाच्या संरक्षण सज्जतेत मोठी वाढ होणार असून वाढत्या सुरक्षा आव्हानांना तोंड देण्याची क्षमता अधिक मजबूत होईल.















