सांगली : गेल्या दशकात उसाची एफआरपी ५४ टक्के म्हणजे २३०० रुपयांवरून ३५५० पर्यंत वाढली आहे. मात्र, तोडणी, वाहतूक खर्च ४९४ वरून ९५८ रुपयांपर्यंत वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा नफा कमी झाला आहे. खत, डिझेल, मजुरीच्या वाढत्या दरामुळे शेती करणे कठीण झाले आहे. साखरेचा दर स्थिर असल्याने कारखान्यांची स्थितीही बिकट आहे. महाराष्ट्रासह देशातील साखर उद्योगातील या अभूतपूर्व आर्थिक कोंडीवर तोडगा काढण्याची गरज आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा धोरणात्मक हस्तक्षेप गरजेचा असल्याचे मत विश्वास कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यकारी संचालक पाटील म्हणाले की, सद्यस्थितीत गेल्या हंगामाच्या, सन २०२४-२५च्या आकडेवारीनुसार, एक टन उसावर कारखान्याचा एकूण खर्च सुमारे ५२५० आहे, तर साखर विक्री आणि उपपदार्थांपासून मिळणारे उत्पन्न केवळ ४९०० इतके आहे. कारखान्यांना प्रति टन ३५० इतका थेट तोटा सहन करावा लागत आहे. याचा गंभीर परिणाम शेतकरी, साखर कारखाने आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे. वाढता उत्पादन खर्च, स्थिर साखर दर आणि धोरणात्मक सुधारणांचा अभाव यामुळे साखर अर्थचक्र विस्कळीत झाले आहे. साखरेचा किमान विक्री दर २०१९ पासून प्रति किलो ३१ रुपयांवर स्थिर आहे, तर उत्पादन खर्च ४३ रुपयांच्या पुढे गेला आहे. यासाठी साखरेची एमएसपी तातडीने ४३ ते ४४ प्रति किलो करावी. इथेनॉलचे दर उसाच्या दराशी संलग्न करून दरवर्षी निश्चित करावेत. तोडणी-वाहतूक खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरण आणि लॉजिस्टिक सुधारणा राबविण्याची गरज आहे.


















