नाशिक : राज्यातील सहकारी साखर उद्योगाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक कारखाने बंद पडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या निर्णयामुळे बंद साखर कारखान्यांना पुन्हा उभारी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. निफाड सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यास परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक गाळपाची सुविधा उपलब्ध होईल. कामगारांना रोजगार, वाहतूकदारांना व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. शासनाने बंद कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ठरविलेल्या धोरणात निफाड कारखान्याचाही समावेश करावा, अशी मागणी नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेने केली आहे.
निफाड कारखान्याच्या आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास करून निधी व आवश्यक नियोजनासह कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यवाही करावी, तसेच प्रस्तावित निफाड ट्रायपोट कामाला गती देण्यात यावी अशी मागणी नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबत नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बोराडे म्हणाले की, या समितीने खरोखर बंद पडलेल्या साखर कारखाना सुरू करण्यासाठी योग्य ते अहवाल शासनापर्यंत पोहोचवून निफाड सहकारी साखर कारखाना सुरू होण्यासाठी आवश्यक ते उपाय सुचवणे गरजेचे आहे. बंद सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाने विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय चांगला आहे.

















