सांगली : हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चिफ केमिस्ट व दीर्घकाळ कारखाना प्रशासनाचे प्रमुख असलेल्या बी. एस. माने व अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केलेल्या गैरकारभाराचा पाढा कारखान्याचे संचालक गौरव नायकवडी यांनी वाचून दाखवला. गौरव नायकवडी म्हणाले, सुमारे चाळीस वर्षे कारखान्यात सेवा करताना बी. एस. माने व अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी संगनमताने केलेला कारभार चव्हाट्यावर आला आहे.
गौरव नायकवडी म्हणाले, वैभव नायकवडी यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती किती खोलवर आहे, याबाबतचे पुरावे टप्प्याटप्प्याने समोर आणले जातील. अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी राजीनामा द्यावा आणि कारखान्याचे कर्ज स्वतः फेडावे या मागणीसाठी गेल्या ३२ दिवसांपासून किरण नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर वैभव नायकवडी यांच्या कारभाराचा पंचनामा केला जात आहे. दरम्यान, हुतात्मा उद्योग समूहातील हुतात्मा किसन अहिर नागरी सहकारी पतसंस्थेची सगळी सूत्रे गौरव नायकवडी यांनी आपल्याकडे घेतली आहेत.


















