कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना नियमित ओव्हरहॉलिंगच्या कामासह ऑक्टोबर २०२६ पर्यंत कारखाना गळीतासाठी सज्ज ठेवण्याचे नियोजन आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी केडीसीसीच्या माध्यमातून आगामी हंगामासाठी अर्थसाहाय्य दिले आहे. त्यातून ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणेला पहिला हप्ता देणम्यात आला आहे. डिस्टिलरी नूतनीकरण गतीने सुरू आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे व उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी दिली. आगामी गळीत हंगामासाठी करार झालेल्या तोडणी-वाहतूक यंत्रणेतील प्रतिनिधींना ॲडव्हान्सपोटी धनादेश वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावर्षीच्या गाळप हंगामात चार लाख टनाचे गाळप करून १२.५० टक्के उताऱ्याने पाच लाख क्विंटल साखर उत्पादनाचे उद्दिष्ट घेतले आहे, असे त्यांनी सांगितले.
कारखाना कार्यस्थळावर आगामी गळीत हंगामासाठी करार झालेल्या तोडणी-वाहतूक यंत्रणेतील प्रतिनिधींना ॲडव्हान्सपोटी धनादेश वितरणप्रसंगी प्रतिनिधी दत्ताजीराव देसाई, प्रभाकर देसाई, अनिल जाधव, सुनील मिसाळ, प्रमोद चौगुले यांना ॲडव्हान्स रकमेपैकी प्रत्येकी चार लाखांच्या पहिला हप्त्याचा धनादेश वितरित करण्यात आला. अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचारी गोविंद जाधव (मुत्नाळ) यांच्या वारसांना विमा कंपनीकडून मिळालेला १९ लाखांचा धनादेशही वितरित केला. यावेळी पताडे म्हणाले की, कारखान्याच्या आधुनिकीकरणात निर्माण झालेल्या समस्यांचे तांत्रिक सल्लागारांकडून निराकरण करण्याचे काम सुरू आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या सहकार्याने सभासदांना सवलतीची साखर दिली जात आहे. यावेळी संचालक, कार्यकारी संचालक सुनील महिंद, प्रशासकीय अधिकारी शामराव हरळीकर, शेती अधिकारी विठ्ठल पाटील, चीफ अकौंटंट बी. आर. रेडेकर व विभागप्रमुख उपस्थित होते.


















