सोलापूर : शेजारील जिल्ह्यांत ऊस पाठविण्यास शेतकऱ्यांचे प्राधान्य, दोन टप्प्यात ३,४५० रुपये दराबाबत शेतकरी असमाधानी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पहिली उचल ३५०० रुपये द्यावी, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली होती. यासाठी आंदोलन करण्यात आले. मात्र, काही कारखानदारांनी आंदोलनाची दखल न घेता ३१०० रुपयांपेक्षा अधिक दर देणार नसल्याची भूमिका घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनीही आंदोलनात सहभागी होत लढा तीव्र केला. त्यानंतर कारखानदारांनी ३२५० रुपये आणि त्यावर २०० रुपये असे एकूण ३४५० रुपये देण्याची भूमिका जाहीर केली. मात्र, या दरावरही शेतकरी समाधानी नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परजिल्ह्यांतील साखर कारखान्यांना ऊस पाठवण्यास पसंती दिली आहे. जिल्ह्यातून दररोज सुमारे १० हजार टन ऊस परजिल्ह्यात जात असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सध्या माळशिरस, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या भागांतून दररोज दहा हजार टनांहून अधिक ऊस परजिल्ह्यांत पाठवला जात आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि कर्नाटकातील काही कारखान्यांनी ३८०० ते ३९०० रुपयांपर्यंत दर जाहीर केला. त्याचा परिणाम दिसू लागला आहे. सांगली जिल्ह्यातून आलेली ४० वाहने सांगोला तालुक्यात ऊस तोडणी करत आहेत. तर सातारा जिल्ह्यातील शरयू, स्वराज्य, साखरवाडी आणि जरंडेश्वर या कारखान्यांची २७५ ते ३०० वाहने, तर पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती (भवानीनगर) या कारखान्यांची १०० वाहने कार्यरत आहेत. कर्नाटकातील कारखान्यांची १०० हून अधिक वाहने मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांत ऊसतोडणी करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांचा गाळप हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर या भागांतून दररोज दहा हजार टन ऊस बाहेर जात आहे असे रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here