लातूर : आपल्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे राज्यभरात नावलौकिक असलेल्या रेणापूर तालुक्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याने ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याला गाळपासाठी आलेल्या उसाला प्रति मे.टन १०० रुपयांप्रमाणे दुसरा हप्त्याची रक्कम २५ मे रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उन्हाळी कामे आणि आगामी खरीप हंगामासाठी खते व बियाणे खरेदी करण्यासाठी या रकमेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागणार आहे.
रेणा सहकारी साखर कारखान्याने या हंगामात एकूण ५ लाख ६८ हजार ८८ मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले आहे. या गाळपातून ५ लाख ७८ हजार २०० क्विंटल साखरेचे दर्जेदार उत्पादन घेण्यात आले असून ज्यूस सिरप व ‘बी हेवी ‘सह कारखान्याला सरासरी १२.२१ टक्के इतका उच्चांकी साखर उतारा मिळाला आहे. सद्यःस्थितीत कारखान्याचा डिस्टिलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून, याद्वारे इथेनॉलचे उत्पादन वेगाने घेतले जात आहे. कारखान्याने शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून प्रति मे.टन २ हजार ७५० रुपये अदा केले होते. आता त्यात १०० रुपयांची भर पडली आहे. या हंगामात ऊस गाळपास आलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


















