पुणे: वेस्ट इन हॉटेलमध्ये वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशनची (विस्मा) साखर आणि जैव ऊर्जा परिषद व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी उद्योगातील विशेष व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल निवडक कारखान्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विस्मातर्फे पाटेठाण (श्रीनाथनगर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याला उल्लेखनीय आर्थिक नियोजनाबद्दल २०२५-२६ चा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट आर्थिक नियोजन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय रस्ते, वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत, कार्याध्यक्ष विकास रासकर, उपाध्यक्ष योगेश ससाणे, सह-कार्यकारी संचालक माधव राऊत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुरस्काराबद्दल कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, कारखान्याने कमी खर्चामध्ये जास्त ऊस उत्पादन घेता यावे यासाठी प्रयत्न सुरू करून यश मिळविले आहे. कारखाना बगॅस, स्टीम व वीजेची बचत, मनुष्यबळाचा योग्य वापर, दर्जेदार साखर उत्पादन करण्यावर भर देत आहे. साखरेबरोबर विविध बायप्रॉडक्ट्स एकाच कारखान्यात उत्पादित होत आहेत. विस्माचा पुरस्कार हा कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचा सन्मान आहे. उत्कृष्ट आर्थिक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून कारखाना प्रगती साधत आहे. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, व्हीएसआयचे उपाध्यक्ष व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, कार्यकारी संचालक अजित चौगुले, कारखान्याचे संचालक महेश करपे, अनिल भुजबळ, अनिल बधे. ज्ञानदेव कदम, संचालक, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.


















