सांगली : कृष्णा कारखाना निवडणुकीच्या प्रचाराला वेग, संस्थापक पॅनलची शिरटेत प्रचारसभा

सांगली : सातारा जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरटे (ता. वाळवा) येथे संस्थापक पॅनेलची प्रचार सभा झाली. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष, कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनलप्रमुख अविनाश मोहिते यांनी सहकार पॅनलवर जोरदार टीका केली. कारखान्याच्या विकासापेक्षा काहीजणांना स्वतःची राजकीय पोळी भाजण्यात अधिक रस आहे. विरोधकांना मुलाची आमदारकी टिकवण्यासाठी आणि निवडणुकांत कारखान्याची यंत्रणा वापरण्यासाठी कारखाना हवा असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांची आर्थिक प्रगती आणि सभासदांचे हित यांच्याशी विरोधकांना काहीही देणे-घेणे नाही. आमच्या कार्यकाळात सभासद शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा तब्बल ३४१ कोटी रुपये अधिक ऊसदर दिला. आज अनेक पाणी योजना बंद पाडल्याची टीका त्यांनी केली.

डॉ. सुरेश भोसले यांनी हिम्मत व स्वाभिमान असेल, तर त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून अविनाश मोहितेंनी एकही रुपया खाल्ला असेल, अशी शपथ घ्यावी,” असे आव्हान मोहिते यांनी दिले. शिरटे येथील सभेला बंडानाना जगताप, उमेदवार माणिक मोरे, सुरेश रोकडे, जयकर शिंदे, महेश पवार उपस्थित होते. सभेत अविनाश मोहिते यांचा सत्कार ग्रामस्थांनी केला. कारखान्यावर विविध बँकांचे सुमारे ९७० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखाना खासगीकरणाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू असून, तो सभासदांनी हाणून पाडला पाहिजे असे मोहिते म्हणाले. श्री. जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गजानन पाटील, बालाजी जगताप, जालिंदर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. शिरटेचे विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले. हणमंत शिंदे यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here