सांगली: माजी आमदार मोहनराव कदम व उदगिरी कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त बामणी-पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी शुगर कारखाना कार्यस्थळी रक्तदान शिबिर व वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राहुल कदम यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण रक्षण व संवर्धनाची गरज ओळखून कारखाना परिसरात शंभर वृक्षांचे रोपण करण्यात आले.
कारखान्याचे पूर्णवेळ संचालक सूर्यकांत पाटील यांनी सांगितले की भारती ब्लड बँक, सांगली यांच्या सहकायनि कारखाना कार्यस्थळी रक्तदान शिबीर झाले. शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. ११३ जणांनी रक्तदान केले. संस्थेच्यावतीने आयोजित वृक्षारोपण मोहिमेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. त्याच्या संवर्धनाची जबाबदारी कर्मचाऱ्यांनी स्वीकारली. या परिसरात अधिकाधिक वृक्ष लागवडीला प्रोत्साहन दिले जाईल असे व्यवस्थापनाच्यावतीने सांगण्यात आले.


















