सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाईसहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेअंतर्गत २२ प्रगतशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुणे येथील व्हीएसआयमध्ये चार दिवसीय प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले. दि. ३० जून ते ३ जुलैदरम्यान होणाऱ्या या प्रशिक्षणात ऊस लागवडीपासून काढणीपर्यंतच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ऊसाचे एकरी उत्पादन वाढवावे; हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. ज्येष्ठ संचालक अशोकराव पाटील यांच्या हस्ते वाहनपूजन करून प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना रवाना करणयात आले. यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग नलवडे, कार्यकारी संचालक सुहास देसाई, शेती अधिकारी वैभव नलवडे, ऊस विकास अधिकारी प्रविण भाट, तसेच अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.


















