कोल्हापूर : गेल्या अनेक आठवड्यांपासून शिरोळ तालुक्यात कडक ऊन आणि पावसाची दडी यामुळे हवेतील आर्द्रता बदलली आहे. हे वातावरण लोकरी माव्याच्या वाढीसाठी पोषक ठरत आहे. तालुक्यात ऊस पिकावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. याचे वेळेत नियंत्रण न झाल्यास यंदा ऊस उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. शिरोळ तालुका हा उसाचे आगर म्हणून ओळखला जातो. मात्र, लोकरी माव्याच्या प्रादुर्भावामुळे उसाचे वजन घटण्याची शक्यता आहे. तसे झाले तर कारखान्याला गाळपासाठी जाणाऱ्या उसाच्या साखर उताऱ्यावर (रिकव्हरी) याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि साखर कारखानदारांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोरड्या वातावरणात लोकरी माव्याचा प्रसार वेगाने होतो. सध्या तालुक्यातील अनेक गावांमधील ऊस पिकात उसाच्या पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाच्या लोकरी माव्याचा थर साचत आहे. ही कीड पानामधील अन्नरस शोषून घेते. परिणामी, उसाची पाने पिवळी पडून वाळू लागली आहेत. उसाची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावल्याने पिकाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना माव्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. सध्या शेतकरी लोकरी मावा नियंत्रणात आणण्यासाठी औषधांची फवारणी करत असून, यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रादुर्भाव झालेली उसाची खालची पाने तोडून नष्ट करावीत. लोकरी मावा खाणाऱ्या ‘कोनोबाथा’ किंवा ‘क्रायसोपा’ या मित्रकिडींचा शेतात वापर करावा. तसेच शेतात नत्रयुक्त खतांचा (युरिया) अतिवापर टाळावा, असे आवाहन केले आहे.


















