अहिल्यानगर : नगर तालुका सहकारी साखर कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी वारसांना परत देण्याची मागणी

अहिल्यानगर : नगर तालुका सहकारी कारखान्यासाठी तत्कालीन संस्थापक कै. दादासाहेब शेळके व संचालक मंडळाने कारखाना उभारणीसाठी जमीन घेताना कुकडीचे पाणी उपलब्ध करून परिसर बारमाही बागायती करण्याचे तसेच जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले. यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. कारखाना २०१२ मध्ये खासगी समुहाला विकला गेला. त्यामुळे भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांंनी कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनीच्या जमीन संपादनावेळी मिळालेला मोबदला सरळ व्याजासह परत करण्याची तयारी दर्शविली असून, मूळ मालकांच्या वारसांना त्यांच्या जमिनी परत देण्याची मागणी केली आहे.

देऊळगाव सिद्धी येथील शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते परसराम जगधने यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, कारखान्यासाठी २५ ते ३० एकर जमिनीची आवश्यकता असताना तब्बल २३५ एकर जमीन संपादित करण्यात आली. या प्रक्रियेत शेतकरी भूमिहीन झाला. कारखाना स्थापन झाल्यानंतर कुकडीचे पाणी उपलब्ध झाले नाही, शेती बागायती झाली नाही आणि मुलांनाही रोजगार मिळाला नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले. निवेदन देताना निवृत्ती वाघमोडे, सोपान वाघमोडे, दत्तू वाघमोडे, मारुती चोभे, भाऊसाहेब चोथे, बाबुराव चोभे, विठोबा बोरकर, सभाजी चोभे, अशोक चोभे, ज्ञानदेव चोभे, मच्छिंद्र बोरकर, साहेबराव बोरकर, आबई इंगळे, नामदेव इंगळे, भाऊ इंगळे, तुकाराम पडळकर, गेनू गिरवले आदी शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here