अहिल्यानगर : शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी उसाला साडेतीन हजार रुपये पहिली उचल मिळावी या मागणीसाठी केलेल्या आंदोलनानंतर निर्णय होईपर्यंत साखर कारखान्यांचे गाळप बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिला आहे. दरम्यान, ऊस दराचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्या, गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे, की २६ तारखेला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसदर निश्चितीसंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीला स्वतः कारखान्याच्या अध्यक्षांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने उपस्थित राहावे. त्यामुळे कारखानदार या बैठकीला उपस्थित राहून किती दर जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात ऊस गळीत हंगाम सुरू होवून दीड महिना होत आला असला, तरी दराचा तिढा कायम आहे. गेल्या आठवड्यात काही साखर कारखान्यांनी ३२०० रुपयांपर्यंत पहिली उचल जाहीर केली. मात्र किमान ३७०० रुपये पहिली उचल द्यावी अशी मागणी करत शेतकरी संघटनांनी आंदोलनाची घोषणा केली. राज्य सहकारी बँकेने साखरेचे ठरवलेले दर, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांत कारखानदारांनी दिलेला दर आदी बाबींचा विचार करून अंतिम दर निश्चित करावा, अशी मागणी करत आंदोलनाची घोषणा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, खासदार नीलेश लंके, आमदार विठ्ठल लंघे, अमोल खताळ, अनिल घनवट, हर्षदा काकडे यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. २३) शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि खासदार लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी आंदोलनकर्त्यांना साखर कारखाने बंद ठेवण्याचा आदेश जारी करत असल्याचे पत्र दिले.


















