नांदेड : कासापुरी सर्कलमधील ऊस उत्पादकांनी तालुक्यातील गोदाकाठ ऑरगॅनिक साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिल मिळत नसल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सोमवारी (दि.६) बेमुदत उपोषणाच्या पाचव्या दिवशीही ते सुरू राहिले. कारखान्याने आपल्या हक्काची रक्कम व्याजासह तातडीने बँक खात्यात जमा करावी, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत सर्व ऊस उत्पादकांना थकीत ऊस बिल मिळत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे आंदोलक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी १० वाजेपासून उपोषण सुरू केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ऊस बिलांसाठी पाठपुरावा करूनही पैसे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी ३० जूनला प्रशासनाला निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला होता. तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. गोदाकाठ ऑरगॅनिक साखर कारखान्याने ऊस गाळप करूनही अनेक महिन्यांपासून थकीत ऊस बिल अदा केले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून आता यातून माघार घेणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलनात काहींनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण शेतकरी निर्णयावर ठाम राहिले आहेत.


















