सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली जाते. ऊस तोडणीनंतर उरणाऱ्या पाचटाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर कायम असतो. बहुतांश शेतकरी पाचट जाळतात. त्यामुळे वायू प्रदूषण वाढते. तसेच पाचट जाळल्याने जमिनीतील सूक्ष्मजीव नष्ट होऊन मातीच्या सुपीकतेवर आणि पिकांच्या उत्पादनक्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि डॉ. सोमनाथ लंबे यांनी संशोधन करून एक पर्यावरणपूरक उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाची उपयुक्तता आणि गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्याला पेटंट प्रदान केले आहे. डॉ. अनिल बाबर आणि डॉ. सोमनाथ लंबे यांनी हे पोर्टेबल ऊस पाचट कंपोस्टर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
ऊस पाचट, सुकलेली पाने, तण तसेच इतर सेंद्रिय अवशेषांपासून कमी वेळात आणि कमी खर्चात दर्जेदार सेंद्रिय कंपोस्ट तयार करण्यास हे उपकरण उपयुक्त ठरते अशी माहिती डॉ. अनिल बाबर यांनी दिली. ते म्हणाले की, पाचट जाळल्यामुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हे उपकरण प्रभावी ठरणार आहे. पाचट न जाळता त्यापासून सेंद्रिय कंपोस्ट तयार केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. त्यामुळे मातीची सुपीकता आणि पाणी धारण क्षमता सुधारण्यासही हातभार लागेल. तर डॉ. सोमनाथ लंबे यांनी सांगितले की, खतांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. तसेच जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढून पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीला चालना मिळेल. हे संशोधन शेतकऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.


















