सोलापूर : गोकुळ शुगरकडून सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऊसबिले गेल्या दोन वर्षांपासून थकीत होती. या थकीत बिलांविरोधात शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात तीव्र आंदोलन छेडले होते, ज्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली. त्यानंतर काढण्यात आलेल्या तोडग्यानंतर थकीत ऊस बिलांपोटी येथील गोकुळ शुगर कारखान्याच्यावतीने आतापर्यंत सुमारे दोन हजार शेतकऱ्यांना ऊसबिलांचे धनादेश वितरित करण्यात आले आहेत. एकूण ३२ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनाही येत्या आठवडाभरात त्यांची रक्कम अदा केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हाधिकारी आणि दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनीही शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कारखान्याकडून चालू वर्षातील ५० कोटी रुपये आणि गतवर्षीच्या हंगामातील जवळपास २ कोटी रुपये थकवण्यात आले होते. सध्या दररोज जवळपास २०० शेतकऱ्यांना धनादेशांचे वाटप केले जात आहे. चालू वर्षातील थकीत ऊसबिल दिल्यानंतर गतवर्षीच्या रकमा दिल्या जाणार आहेत. याबाबत गोकुळ शुगर संघर्ष समितीचे नेते अॅड. अमोल पाटील म्हणाले की, आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले आहेत, त्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची ऊस बिले अदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील हंगामातील थकीत रक्कमही पुढील आठवड्यात दिली जाईल.


















