सातारा : जिल्ह्यात कृषी विभाग आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पासाठी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र बारामती, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्यामार्फत शेतकऱ्यांना लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय संकुल काळोली (ता. पाटण) येथे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठक झाली. या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, कृषी विज्ञान केंद्र बारामती, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषयतज्ज्ञ उपस्थित होते. बैठकीत प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादकता वाढ या नावीन्यपूर्ण प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले की, उत्पादन वाढवून आणि खर्चात कपात करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा निव्वळ नफा वाढवणे. मातीच्या गरजेनुसार एआय प्रणाली खतांची मात्रा ठरवते, ज्यामुळे खतांचा अतिरिक्त खर्च कमी होतो. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मशागत आणि देखरेखीचा मजुरी खर्च सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी कमी करून ४० टक्केपर्यंत पाण्याची बचत करणे हा उद्देश आहे. दरम्य़ान, ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, वातावरणातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान शक्यता यासह वातावरणातील पुढच्या १४ दिवसांत होणारे बदल याबाबतची माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार आहे. यातून ऊस उत्पादन खर्चात ४० टक्क्यांची बचत होऊन, ऊस उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होऊन एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट सहज शक्य होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


















