यवतमाळ : केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित २० टक्के पेट्रोल विक्रीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वाहतूक व्यवसायात प्रचंड मोठी अडचण निर्माण झालेली आहे. वाहनाचे इंजिन तथा इतर महत्त्वाचे पार्ट खराब होत असून, वाहनांचे आयुष्यमान कमी होत आहे. काही लोकांच्या स्वार्थासाठी राजकीय पाठबळामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकले जात आहे. हा निर्णय सर्वसामान्य जनतेवरती लादण्यात आलेला आहे. केंद्र सरकारमुळे वाहतूक व्यवसायाला लागलेली ही कीड तातडीने दूर करण्यात यावी, इथेनॉलमिश्रित पेट्रोलची विक्री ताबडतोब थांबविण्यात यावी. या इथेनॉल मिश्रित पेट्रोल विक्रीसाठी जबाबदार असलेल्या कंपन्या तथा सरकारमधील मंत्री व जबाबदार अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि नागरिकांना न्याय देण्यात यावा, अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेने म्हटले आहे कि, इथेनॉल मिश्रित इंधनाचा वाहनांच्या इंजिनवर परिणामांचा होणाऱ्या स्वतंत्र वैज्ञानिक अभ्यास होणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे पूर्णता दुर्लक्ष करण्यात आले. २०१५ पूर्वीच्या वाहनांसाठी ई २० पेट्रोलची सक्ती करू नये, कारण ती वाहने या इंधनासाठी डिझाइन केलेली नाहीत. पर्यटन वाहनांवरील ८० किमी प्रतितास वेगमर्यादेचा पुनर्विचार करावा. वाहन स्क्रॅप धोरणासह अन्य नियमांचे पुनर्मूल्यांकन करावे. याविषयाचे निवेदन संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शाम बजाज, राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान, दिनेश बगमारे, गोपाल महल्ले, पन्नालाल गंडेचा, प्रफुल्ल ठाकरे, पवन परडखे, अजय देऊळकर, रोशन भोयर, विजय वानखडे, महेश ढंगरे, निखिल दौलतकार यांच्यासह अनेकांनी निवेदन सादर केले.


















