दावणगेरे : पेट्रोलमध्ये इथेनॉलचे ३० टक्क्यांपर्यंत मिश्रण केले जात असल्याच्या आरोपावरून कर्नाटक आणि केंद्र सरकारमधील वाद अधिक तीव्र झाला आहे. कर्नाटकचे मंत्री रिझवान अर्शद यांनी बुधवारी केंद्र सरकारवर टीका करताना राज्याने तपासणीसाठी पाठवलेल्या ६३ नमुन्यांचा अहवाल अद्याप देण्यात आलेला नसल्याचा आरोप केला. दावणगेरे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अर्शद यांनी पेट्रोल पुरवठा करणाऱ्या तेल कंपन्यांनी स्वतःच नमुन्यांची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला.
मंत्री अर्शद म्हणाले, “राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली इथेनॉलची तपासणी करण्यात आलेली नाही, तर केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेत ही तपासणी झाली आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल पुरवठा करणाऱ्या तेल कंपनीनेच पेट्रोलची तपासणी केली. कंपनीने स्वतःच नमुने तपासून अहवाल सादर केला, तर ते कितपत योग्य आहे? मात्र, या प्रकरणात हाच मार्ग योग्य असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे धोरण निश्चित केले आहे. मग आता ३० टक्के इथेनॉल का मिसळले जात आहे? मी स्वतः राज्यातील ६३ नमुने तपासणीसाठी केंद्राकडे पाठवले होते. मात्र, केंद्राने अद्याप त्याबाबत कोणताही अहवाल दिलेला नाही. “केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेलाही अर्शद यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच या प्रकरणावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली.
अर्शद म्हणाले, “सामान्य नागरिकांच्या वाहनाचे नुकसान झाले, तर त्याची भरपाई कोण देणार? एक जबाबदार व्यक्ती म्हणून आम्ही हा प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारने जनतेच्या हितासाठी नेमके काय केले आहे? केंद्रीय मंत्री जोशी यांनी आम्हाला मूर्ख म्हटले आहे. मग संबंधित मंत्री हरदीप सिंह पुरी या विषयावर का बोलत नाहीत? कुमारस्वामी यांनी यापूर्वी ३० टक्के इथेनॉल मिश्रणाचा विचार झाल्याचे मान्य केले आहे. तज्ज्ञांचा सल्ला न घेता आणि जनतेला माहिती न देता ३० टक्के इथेनॉल मिश्रण का करण्यात आले? हा प्रश्न मी जबाबदार नागरिक म्हणून उपस्थित केला आहे.”
प्रल्हाद जोशी यांची काँग्रेसवर टीका
यापूर्वी मंगळवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला “बोगस नेत्याने चालवलेले बोगस आंदोलन” असे संबोधले. या आरोपांमागील व्यावसायिक तर्कावर प्रश्न उपस्थित करत जोशी यांनी कच्चे तेल, पेट्रोल आणि इथेनॉलच्या किमतींचा उल्लेख केला. शेतकऱ्यांना मदत करणे आणि भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
जोशी म्हणाले, “कच्च्या तेलाच्या किमती इतक्या जास्त असताना, पेट्रोलची मूळ किंमत ५३ रुपये आणि मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत ५७ ते ७१ रुपये असताना त्यांच्या दाव्यांना कोणताही व्यावसायिक आधार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि आयातीवर अवलंबून न राहता देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.”
कर्नाटकात ३१.२ टक्के इथेनॉल मिश्रणाचा आरोप
कर्नाटकात पेट्रोलमध्ये ३१.२ टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळले जात असल्याचा आरोप रिझवान अर्शद यांनी केल्यानंतर हा वाद सुरू झाला. मात्र, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माहितीनुसार, २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांकडून घेतलेल्या E20 पेट्रोलच्या सर्व ८९३ नमुन्यांनी निर्धारित गुणवत्ता मानकांची पूर्तता केली आहे. त्यामुळे पेट्रोलमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त इथेनॉल मिसळले जात असल्याचे दावे मंत्रालयाने फेटाळले आहेत.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तीन सरकारी तेल विपणन कंपन्यांनीही संयुक्त निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इथेनॉल मिश्रणाची प्रक्रिया ही कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियंत्रित आणि स्वयंचलित पद्धतीने केली जाते. त्यात मानवी हस्तक्षेपाने मनमानी पद्धतीने मिश्रण केले जात नाही, असे या कंपन्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने मात्र आपल्या तपासणीतील निष्कर्षांवर ठाम भूमिका कायम ठेवली असून, तेल विपणन कंपन्यांच्या संयुक्त निवेदनातील दावे फेटाळले आहेत. त्यामुळे पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणावरून केंद्र आणि कर्नाटक सरकारमधील वाद कायम आहे.


















