बेंगळुरू : ट्रूअल्ट बायोएनर्जी लिमिटेडच्या संचालक मंडळाने कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बादामी तालुक्यातील मुत्तलागेरी गावात असलेली कंपनीचे युनिट-5 ओंकार अॅग्रो शुगर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 171 कोटी रुपयांच्या मोबदल्यात स्लंप सेल पद्धतीने विकण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय 4 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र हा व्यवहार अंतिम करार (डिफिनिटिव्ह अॅग्रीमेंट्स) आणि आवश्यक अटी पूर्ण झाल्यानंतरच पूर्ण होणार आहे.
कंपनीने स्पष्ट केले की, या विक्रीचा उद्देश आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि कार्यकारी कार्यक्षमता सुधारणे हा आहे. युनिट-5 सध्या कंपनीच्या महसुलात कोणतेही योगदान देत नसून ती मुख्य व्यवसायाशी संबंधित नसलेली मालमत्ता (नॉन-कोर अॅसेट) म्हणून ओळखली जाते. नियामक फाइलिंगनुसार, युनिट-5 वर इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) कडील सुमारे 135 कोटी रुपयांचे मुदत कर्ज आहे. या कर्जावरील आर्थिक खर्चामुळे कंपनीच्या नफ्यावर आणि रोख प्रवाहावर सतत ताण येत होता. जमीन, इमारत, प्रकल्प व यंत्रसामग्री तसेच इतर चल मालमत्ता यांचा समावेश असलेली संपूर्ण युनिट गोइंग कन्सर्न स्वरूपात विकली जाणार आहे.
कंपनीने सांगितले की, विक्रीतून मिळणारी रक्कम प्रामुख्याने IREDA चे थकीत कर्ज फेडण्यासाठी वापरली जाईल, तर उर्वरित निधी कंपनीच्या मुख्य व्यवसायात आणि उच्च वाढीच्या संधींमध्ये गुंतवला जाईल. या व्यवहारामुळे भांडवलाचे अधिक कार्यक्षम वाटप, बॅलन्स शीट अधिक मजबूत होणे आणि भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती होईल, असा कंपनीचा दावा आहे.
ट्रूअल्ट बायोएनर्जी आणि ओंकार अॅग्रो शुगर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात 4 ऑगस्ट 2026 रोजी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. अंतिम करार योग्य तपासणी (ड्यू डिलिजन्स), पूर्वअटींची पूर्तता आणि आवश्यक वैधानिक व नियामक मंजुरी मिळाल्यानंतर करण्यात येतील.कंपनीने स्पष्ट केले की ओंकार अॅग्रो शुगर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ट्रूऑल्टच्या प्रवर्तक किंवा प्रवर्तक गटाशी संबंधित नाही. त्यामुळे हा व्यवहार संबंधित पक्षाचा (रिलेटेड पार्टी) व्यवहार नाही आणि कोणत्याही विलिनीकरण किंवा पुनर्रचना योजनेचा भागही नाही.
फाइलिंगनुसार, 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात युनिट-5 कडून कोणताही उलाढालीचा (टर्नओव्हर) वाटा नव्हता. युनिट-5 च्या निव्वळ मालमत्तेचे वहन मूल्य 159.32 कोटी रुपये होते, जे त्या तारखेला कंपनीच्या एकूण निव्वळ संपत्तीच्या 10.53 टक्के इतके होते. ट्रूअल्ट बायोएनर्जीला हा व्यवहार 4 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.


















