नांदेड : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीन दिवसीय ऊस रोपवाटिका तंत्रज्ञान व व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम झाला. याला शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये दिवसेंदिवस ऊस उत्पादकता कमी होत असल्याने आगामी काळात ऊस उत्पादन व उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला. कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये कार्यक्षेत्रातील विविध गावांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना ऊस रोपवाटिका उभारणी, प्रमाणित ऊस जातींची निवड, निरोगी व गुणवत्तापूर्ण ऊस रोपांची निर्मिती, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध ऊस रोपांची निर्मिती याबाबत शास्त्रशुद्ध व प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
चेअरमन नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे महासंचालक संभाजी कडू पाटील होते. यावेळी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, वैज्ञानिक डॉ. समाधान सुरवसे, वैज्ञानिक राजेंद्र भोईटे, तज्ज्ञ तुषार जाधव, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील विविध गावातील २७ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढवून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादनाला पुन्हा चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. ऊस उत्पादनाची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी निरोगी, दर्जेदार व शुद्ध ऊस रोपांची निर्मिती अत्यंत महत्त्वाची आहे. या बाबीचा विचार करून कारखाना व्यवस्थापनाने राबविलेला हा उपक्रम शेतकरी हिताचा आणि दूरदृष्टीचा निर्णय असल्याचे मत व्यक्त होत आहे. प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक ऊस रोपवाटिका तंत्रज्ञान प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली असून, त्याचा उपयोग स्वतःच्या शेतात दर्जेदार व निरोगी ऊस रोपे तयार करण्यासाठी होणार असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमासाठी चेअरमन नरेंद्रदादा चव्हाण, संचालक मंडळाचे शेतकऱ्यांनी अभिनंदन केले.


















