सोलापूर : पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस तालुक्यातील उसावर सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ४२ साखर कारखाने अवलंबून आहेत. या ऊस शेतीच्या माध्यमातून जिल्ह्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून असताना यावर्षी अपुऱ्या पावसामुळे घटलेल्या उत्पादनामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असून शेकडो कोटींचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. जिल्ह्यात जवळपास ४२ साखर कारखाने आहेत. पैकी काही बंद असले तरी उर्वरीत कारखान्यांनाही कमी ऊस उपलब्धतेचा मोठा फटका बसू शकतो. पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा तालुक्यात पिकवल्या जाणाऱ्या या उसावर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, धाराशिव, अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा केला जातो. या सर्वच कारखान्यांना ऊस टंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.
भीमा नदी, उजनीचा डावा, उजवा कालवा व निरा कालव्यामुळे पंढरपूर तालुक्यातील जवळपास ५५ हजार हेक्टरपेक्षा जास्त उसाची लागवड केली जाते. माळशिरस तालुक्यातून वाहत असलेली निरा नदी, उजनी व निरा-भाटघरच्या पाण्यामुळे ५० टक्के उसाचे क्षेत्र आहे. मंगळवेढा, सांगोला तालुक्यातही फळबागांबरोबर माण नदी व कॅनॉल पट्टयात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यावर तालुक्यातील व्यावसायिकांचे मोठे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. त्यानुसार एखादा-दुसरा पाऊस वगळता पंढरपूरसह इतर तीन तालुक्यात अद्यापपर्यंत एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे तालुक्याचे अर्थकारण बिघडण्याची चिन्हे आहेत. परिणामी शेतकऱ्यांवरील असलेला कर्जाचा बोजा कमी होणेही अवघड बनले आहे.


















