सोलापूर : सीमाभागातील शेतकऱ्यांनी स्वीकारला कर्नाटकमधील साखर कारखान्यांचा पर्याय

सोलापूर : सध्या भीमा आणि सीना या दोन्ही नद्या पूर्णपणे आटल्याने आणि विंधनविहिरी (बोअर) कोरड्या पडल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील ऊस दरावर अद्याप तोडगा निघालेला नाही. साखर कारखानदारांना जिल्हा प्रशासनाने शनिवारपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे “जिथे चांगला भाव, तिथे ऊस” या धोरणाने शेतकरी आपला ऊस पाठवत आहेत. विजयपूर जिल्ह्यातील कारखान्यांनी जाहीर केलेले दर सीमाभागातील शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरत आहेत. कर्नाटकातील कारखान्यांनी उसाला चांगला दर जाहीर केल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी आपला ऊस कर्नाटककडे पाठवण्यास सुरुवात केली आहे.

कर्नाटकातील साखर कारखान्यांनी चांगला दर जाहीर केला आहे. चडचण तालुक्यातील हविनाळ येथील श्रीदत्त साखर कारखान्याने ३,७११ रुपये, तर इंडी तालुक्यातील धुळखेड येथील भीमाशंकर साखर कारखान्याने ३,७०० रुपये प्रतिटन दर जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांच्या तुलनेत हा दर अधिक असल्याने दक्षिण सोलापूरमधील सीमावर्ती भागातील ऊस उत्पादकांचा कल कर्नाटकातील या कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सध्या दक्षिण सोलापूरमध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न असतानाच, गावागावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्याही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अशा परिस्थितीत ऊस लवकर गाळपासाठी जावा आणि त्याला चांगला दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. याबाबत तेलगावचे शेतकरी धर्मराज पुजारी यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकातील कारखान्यांनी ३,७०० ते ३,७११ रुपयांपर्यंत चांगला दर जाहीर केला आहे. त्यामुळे तिथे ऊस पाठवत आहोत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here