पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. येत्या आठ दिवसांत कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनासह निवडणूक प्राधिकरणाची लगबग सुरू झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार यादी दि. २१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याशिवाय, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांवर निवडणूक होणार आहे. पाच गटांतून प्रत्येकी तीन याप्रमाणे १५ जागा, अनुसूचित जाती-जमाती गटातून एक, इतर मागासवर्गीय गटातून एक, भटक्या-विमुक्त जाती-जमाती गटातून एक, महिला राखीव गटातून दोन आणि ‘ब’ वर्ग संस्था प्रतिनिधी गटातून एक अशा जागांचा समावेश आहे.
आमदार रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन चर्चेतून निवडणूक बिनविरोध करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, दुसरीकडे भाजप, दोन्ही शिवसेना तसेच विविध स्थानिक आघाड्यांकडून निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी सुरू आहे. अंतिम मतदार यादी प्रादेशिक सहसंचालक, सहकारी संस्था पुणे, सोमेश्वर कारखाना, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, बारामती तसेच तहसील कार्यालय, बारामती येथे सभासदांच्या पाहणीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यंदा कारखान्याच्या संचालक मंडळात अनुभवी, उच्च शिक्षित तसेच नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीचे बिगुल वाजल्याने इच्छुक उमेदवारांनी सभासद शेतकऱ्यांच्या गाठीभेटींवर भर देण्यास सुरुवात केली आहे. कारखान्याने अनुदानासह उच्चांकी ४ हजार रुपये प्रतिटन ऊसदर दिल्याने सभासद शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. निवडणूक बिनविरोध होणार की रंगणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.


















