सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात वाढ झाल्याने काही दिवसांपूर्वी गुळाच्या मागणीलाही आधार मिळाला होता. किरकोळ बाजारात गुळाचा दर ८० रुपयांपर्यंत गेला होता. घाऊक बाजारात दहा किलो गुळासाठी ७०० रुपये मोजावे लागत होते. मात्र, केंद्र सरकारने राबविलेल्या उपाययोजनेनंतर साखरेचे दर ५० ते ५५ रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. साखर दरातील घसरणीचा परिणाम गुळाच्या बाजारावरही झाला असून, गुळाचे दर प्रतिकिलो १० रुपयांनी कमी झाले आहेत. शहरातील किरकोळ बाजारात ८० रुपयांवर पोचलेला गूळ आता ७० रुपये प्रतिकिलो झाला आहे. यंदा पावसाची स्थितीही समाधानकारक नसल्याने आगामी ऊस उत्पादनाबाबत अनिश्चितता आहे. ऊसाची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नसल्याने गुऱ्हाळे कधी सुरू होतील, यावर आवक अवलंबून राहणार आहे.
सोलापूर शहरात सांगली, केडगाव, उदगीर, लातूर तसेच कर्नाटकातील रायबाग येथून गुळाची आवक होते. सध्या शीतगृहातील गुळाचा दर सुमारे ६५ रुपये, तर रायबाग येथील गुळाचा दर सुमारे ५२ रुपये प्रतिकिलो आहे. सोलापूर बाजार समितीतही काही वर्षांत गुळाची आवक लक्षणीयरीत्या घटली आहे. गुळाचे उत्पादन कमी असून नवीन उत्पादन बाजारात येण्यास अजून दोन-अडीच महिने आहेत. त्यामुळे दिवाळीपर्यंत गुळाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन गुळाची आवक वाढल्यास दर कमी होऊ शकतात असे गुळ व्यापारी प्रकाश जावळे यांनी सांगितले. सध्या घाऊक बाजारात गुळाचे दर ६० ते ६५ रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले आहेत. मात्र, उत्पादन कमी असून नवीन गूळ बाजारात येण्यास अद्याप दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत दरात मोठी चढ-उतार होण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

















